सावंतवाडी येथून घेतले ताब्यात
सावंतवाडी : बीड येथून एका अल्पवयीन मुलीला पळवून आणून सावंतवाडी येथे पाच महिन्यांपासून भाड्याच्या घरात ठेवणाऱ्या तरुणाला शनिवारी सावंतवाडी पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचा शोध पूर्ण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी बीड पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अपहरण आणि पळवून नेल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. गेल्या पाच महिन्यांपासून बीड पोलीस या मुलीचा कसून शोध घेत होते.
दरम्यान, ती मुलगी सावंतवाडी येथे राहत असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर शनिवारी बीड पोलिसांचे एक पथक सावंतवाडीत दाखल झाले. सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने शहरातील एका भाड्याच्या घरातून त्या तरुणाला आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी उशिरा बीड पोलीस त्या दोघांना घेऊन बीडकडे रवाना झाले. या कारवाईमुळे अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुंता सुटला आहे.