दोडामार्ग तालुक्यातील कसईनाथ डोंगराचा काही भाग कोसळला; परिसरात खळबळ

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील ऐतिहासिक आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कसईनाथ (पांडवकालीन) डोंगराचा काही भाग रविवार सायंकाळच्या सुमारास कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गिरोडे गावाच्या दिशेने सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

घटनेची सविस्तर माहिती

गिरोडा गावातील काही ग्रामस्थ शेतात काम करत असताना डोंगराचा काही भाग मोठ्या आवाजात कोसळल्याचे त्यांनी पाहिले. अंधारामुळे नेमकी किती पडझड झाली, याचा अंदाज लावणे कठीण असले तरी, मोठ्या प्रमाणात दगड आणि झाडी खाली आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर डोंगरातील मोर आणि माकडे १५ ते २० मिनिटे मोठ्याने ओरडत होती, असेही ग्रामस्थांनी सांगितले. सायंकाळी उशिरा घटना घडल्याने आणि अंधारामुळे तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करणे शक्य झाले नाही.

वनविभागाला माहिती नाही

या घटनेसंदर्भात दोडामार्ग वनविभागाला विचारणा केली असता, त्यांना अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, गिरोडे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीमुळे तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

कसईनाथ डोंगराचे महत्त्व

आंबेली आणि गिरोडे गावांना लागून असलेला कसईनाथ डोंगर हा दोडामार्ग तालुक्याची एक महत्त्वाची ओळख आहे. या डोंगरावर महादेवाचे स्वयंभू सिद्धनाथ स्थान असून, श्रावण महिन्यात आणि उन्हाळ्यातही हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या डोंगरावरुन निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवायला मिळते, तसेच गोवा राज्याचा काही भागही येथून दिसतो.
या घटनेमुळे कसईनाथ डोंगराच्या सुरक्षिततेबाबत आणि या परिसरातील वन्यजीवांवर झालेल्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील काळात वनविभाग आणि स्थानिक प्रशासन या घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे.

error: Content is protected !!