पंढरपूर निवासी विठू माऊलीच्या आषाढी वारीचे औचित्य साधून येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्था ही नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांना अग्रक्रम देत असते. आजही आषाढी वारीचे निमित्त साधून नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना घेऊन वारीचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी स्त्री पुरुषांच्या वेषात ४जुलै रोजी सजून _धजून या वारीत विद्यार्थी सहभागी झाले होते.सकाळी ठिक १० वाजता सदरच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.टाळ मृदुंगाच्या साथीने ‘
“या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवीला”
“वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला'” असा विठुनामाचा गजर करीत प्रशालेपासून ते ब्राह्मणदेव मंदिरापर्यंत पायी वारी काढण्यात आली. सदरची वारी ब्रह्मदेव मंदिरात विसावल्यावर वारकरी भजनाचे सादरीकरण शिक्षकांकडून करण्यात आले. त्याला सर्व वारक-यांनी भक्तिभावाने साथ दिली. त्यानंतर सर्व वारक-यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
वारीमध्ये मुलांबरोबर शिक्षकांनीही वारकरी वेषात वारीचा मनमुराद आनंद लुटला. वारीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विठूमाऊलीला भेटून आल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्या चैताली बांदेकर यांच्या मार्गदर्शना खाली प्रसाद कानडे व त्यांच्या कर्मचारी, शिक्षक यांनी सुंदर अशा एका वारीचे आयोजन केले होते.