मालवण येथील घटना
मालवण : लग्न करते असे आमिष दाखवून मालवण येथील तरुणाची लाखों रुपये आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी वेंगुर्ला येथील श्रद्धा दीपक वालावलकर या महिलेला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्या नंतर १२ तासात संशयित आरोपीचा शोध घेऊन पोलीसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण येथील एका तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून संशयित महिला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून फसवणूक करतं सुमारे १ लाख ६३ हजार गुगल पे द्वारे घेऊन फसवणूक केली.
या प्रकरणी त्या तरुणांने मालवण पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली घनश्याम आढाव यांनी गुन्ह्याच्या तपासा अनुषंगाने तात्काळ तपास पथक रवाना केले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यतील संशयीत आरोपी श्रद्धा दिपक वालावलकर राहणार वेंगुर्ले हिला वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वातील उपनिरीक्षक विलास टेंबुलकर, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक आरती खोबरेकर, पोलीस हवालदार सुशांत पवार, महादेव घागरे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.
संशयित आरोपी यांना मालवण पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली असून सोमवारी मालवण न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती मालवण पोलीसांनी दिली.
संशयित महिला आरोपीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या दृष्टीनेही तपास केला जाणार आहे. अशी माहिती मालवण पोलिसांनी दिली.
संशयित आरोपीकडून नातेवाईक तरुणीच्या फोटोचा वापर
संशयित महिला आरोपी हिने आपल्या एका नातेवाईक तरुणीचा फोटो सोशल मीडिया डीपी ला लावून तरुणांशी ओळख वाढवून त्यांची फसवणूक केली. मालवण येथील तरुणांचीही अशीच फसवणूक करण्यात आली आहे.













