बांदा : मडुरे येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मडूरा-परबवाडी येथील अनेक ग्रामस्थांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये महावितरणविरोधात संतापाचे वातावरण आहे.
या दुर्घटनेत उपसरपंच बाळू गावडे यांच्या घरातील मीटर जळून मोठा भडका उडाला, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना जोरदार शॉक बसला. सुदैवाने स्थानिक रहिवासी रुपेश परब यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मुख्य स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. परबवाडीतील अनेक घरांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. टीव्ही, फ्रिज, पंखे आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप संतप्त स्थानिकांनी केला आहे. या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.