कामावर असताना वॉचमनचा मृत्यू

सावंतवाडी येथील घटना

सावंतवाडी : सावंतवाडी येथील वनश्री अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत असलेले सुरेश विठोबा जाधव (वय ६२, रा. आंबेगाव, जाधववाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांचा आज दुपारी कामावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

सुरेश जाधव हे नेहमीप्रमाणे आज दुपारी सावंतवाडी भटवाडी येथील वनश्री अपार्टमेंट येथे वॉचमनच्या कामासाठी आले होते. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. सहकारी आणि नागरिकांनी तातडीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच, सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुरेश जाधव यांचे पुतणे पुंडलिक गुणाजी जाधव (वय ४१, रा. आंबेगाव, जाधववाडी, ता. सावंतवाडी) यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार अनिल धुरी हे करीत आहेत. जाधव यांच्या आकस्मिक निधनाने आंबेगाव आणि सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!