सावंतवाडी : आपल्या मुलाच्या अपघाती निधनाचे वृत्त ऐकून बापाचे निधन झाल्याचा प्रकार आज शहरात घडला आहे. या घटनेमुळे अनेकांचे हृदय हे हेलावले. सॅव्हीयो संभया (वय ४८) असे त्यांचे नाव आहे. काल त्यांचा मुलगा क्रिश संभया (वय १८) याचा कारीवडे येथील धरणात बुडून मृत्यू झाला होता. मृत्यूची बातमी ऐकताच त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्यांना अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, क्रिश हा काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास फोटो काढायला जात असल्याचे घरी आईला सांगून आपल्या दुचाकीने मित्र-मैत्रिणींसह कारीवडे धरणावर फिरायला गेला होता. धरणाच्या ठिकाणी फोटो काढत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो पाण्यात पडला. ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तसेच बाबल अल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमने सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत धरणाच्या पाण्यात क्रिशचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. अखेर, रात्री ११ वाजता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यानंतर तो पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच त्याचे वडील सॅव्हीयो संभया यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने आज निधन झाले.


Subscribe







