वैध कागदपत्रांशिवाय जून महिन्यापासून वास्तव्य
रत्नागिरी प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे.तब्बल जून महिन्यांपासून चिरेखानित अवैधरीत्या राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखेने ही मोठी कारवाई केली आहे.रत्नागिरी तालुक्यातील नाखरे कालरकोंडवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. या परिसरात बांग्लादेशी राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्व बांगलादेशी आसिफ सावकार यांच्या नाखरे- कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर जून २०२४ पासून राहत होते.
१३ बांगलादेशी गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरीमध्ये काम करत आहेत. हे सर्वजण वैध कागदपत्रांशिवाय बांगलादेश सीमेवरील मुलखी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीने भारतात आले आहेत. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली. या सर्व बांगलादेशीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम, पोलिस अंमलदार उदय चांदणे, महेश गुरव, रत्नाकांत शिंदे, विजय कदम यांनी ही कामगिरी केलीय.
कोकणात विनापरवाना कुठलेही कागदपत्र सादर न करता असे कर्मचारी कामावर ठेवणे ही बाब संपूर्ण कोकणवासीयांसाठी चिंताजनक आहे. परप्रांतीय लोक इथे येऊन जर वास्तव्य करू लागले तर सरकार स्थानिक प्रशासन लोकांच्या संरक्षणाचा प्रश्न धाब्यावर बसवत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.जून महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांचा मागोवा पोलिसांना तब्बल सहा महिन्यांनी लागावा ही शोकांतिका आहे.कोकणात अजून असे किती परप्रांतीय लोक येऊन वास्तव्य करत आहेत आणि त्यांचा नेमका हेतू काय आहे याचा मागोवा पोलिसांनी तसेच स्थानिक प्रशासनाने घ्यावा. अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.