सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ हजार ७०० हून अधिक साधक गोव्याकडे रवाना
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा-फोंडा येथे १७ ते १९ मे या कालावधीत होणाऱ्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ हजार ७०० हून अधिक साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ मोठ्या उत्साहात गोव्याकडे रवाना झाले आहेत. तोरसे गावाचे उपसरपंच विजय तोरसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर यांच्याहस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले याप्रसंगी वाफोलीचे माजी सरपंच विष्णू गवस, धर्मप्रेमी स्वागत नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रवासासाठी १७ बस, १२ टेम्पो ट्रॅव्हलर आणि १२५ इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व सहभागी भगव्या टोप्या परिधान करून आले होते तर वाहनांवर लावलेल्या भगव्या ध्वजांमुळे आणि कार्यकर्त्यांच्या जयघोषांमुळे संपूर्ण वातावरण भगवेमय आणि चैतन्यमय झाले होते.