कुडाळ : “राजकारणातील मूल्याधिष्ठित तपस्वी लोकनेता म्हणजे प्रा.मधु दंडवते. समाजकारणाचा साठी राजकारणात आलेले व आयुष्यभर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने लोकनेते, खासदार, मंत्री म्हणून कार्यरत राहून सत्याचरणाने निष्कलंक राजकारणी जीवन जगण्याचा आदर्श घालून देणारे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री प्रा मधु दंडवते एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. असे उद्गार बॅरिस्टर नाथ पै कला वाणिज्य विज्ञान महिला/रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज ज्यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै संस्थेच्या वतीने कुडाळ रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रा .मधु दंडवते यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “कोकणचा विकास ज्या कोकण रेल्वेमुळे वेगाने होत आहे. कोकणी माणसाला कोकणाशी सतत जोडलेले राहायची सुसंधी प्राप्त झाली आहे. त्या कोकण रेल्वेचे ऋण कधी विसरून चालणार नाही. कोकण रेल्वे व्हावी हे वालावलकर ,बॅरिस्टर नाथ पै यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी प्रा.मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस यांनी जे योगदान दिलेले आहे ते विसरता येण्याजोगे नाही. पाच वेळा खासदार राहूनही जे निष्कलंक जीवन जगले, त्या प्रा.मधु दंडवतेचा आदर्श आजच्या लोकनेते म्हणून घेणाऱ्यानी- सर्वांनी समोर ठेवून काम केले पाहिजे. अशा गरजेचे प्रतिपादन करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कोकणच्या विकासातील योगदानाची स्मृती ताजी रहावी म्हणून बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे मधु दंडवते यांची जयंती ,पुण्यतिथी विविध रेल्वे स्टेशन मध्ये जाऊन व शैक्षणिक संस्थेच्या आवारात साजरी केली जाते. व त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
यावेळी कुडाळ रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर श्रीम मेघा, श्री व्ही आर सावंत व त्यांचे सहकारी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे शिक्षक प्रा मिताली सावंत व विद्यार्थी, रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याचवेळी चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षण संस्थेमध्ये व सावंतवाडी रेल्वे स्टेशन मधील मधु दंडवते यांच्या प्रतिमेस प्रा.परेश धावडे , श्री प्रसाद कानडे प्रिया केडगाळे ,मधुरा इन्सुलकर, सावंतवाडी रेल्वे स्टेशन मास्तर गौरव चाळके रेल्वे कर्मचारी शिवप्रसाद पेडणेकर, बाबल, विश्वनाथ करांदे, प्रियंका कुडव, यांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण केली.













