सिंधुदुर्ग : जिल्ह्याला डोंगरी निकष लावून १५ मार्च २०२४ च्या जाचक संच मान्यता परिपत्रक रद्द करावे यासाठी पालघर येथे २६ एप्रिलला होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ठराव मांडणार आहे, असे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्यस्तरीय अधिवेशन २६ एप्रिलला शिक्षण महर्षी स. तू. कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पालघर येथे होणार आहे. या अधिवेशनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बहुसंख्येने उपस्थित राहण्यासाठी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नियोजनाची सभा आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १५ मार्च २०२४ च्या जाचक संचमान्यतेमुळे एकूण १९८ शाळांपैकी ९१ शुन्य शिक्षकी तर ६० एक शिक्षकी शाळा होणार आहेत. ८४५ शिक्षक, मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक व पर्यवेक्षक अतिरिक्त होणार असुन या सर्वांना या जाचक संचमान्यतेमुळे जिल्हा, विभाग, राज्य अशाप्रकारे समायोजनाला सामोरे जावे लागेल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी माध्यमाचे शिक्षण धोक्यात आले आहे. ग्रामीण भागातील शाळा बंद झाल्यास गरीबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागेल.
या सभेला संबोधित करत असताना शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी १५ मार्च २०२४ रोजी चे संच मान्यता जाचक परिपत्रक सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगरी निकष लावून रद्द करण्यात यावे यासाठी पालघर येथील राज्य अधिवेशना मध्ये ठराव मांडणार आहोत असे सांगितले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफचे राज्य अधिवेशन २६ एप्रिल रोजी शिक्षण महर्षी स. तु. कदम विद्यालय व कनिष्ठ महा विद्यालय महाविद्यालय पालघर येथे होणार आहे. सकाळी ८.३० वाजता पालघर येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून शोभायात्रा निघणार आहे. १० वाजता ध्वजारोहण होईल.
या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्याध्यक्ष जी. के. थोरात या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, नामदार पंकज भोयर, शिक्षण राज्यमंत्री, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार सत्यजित तांबे, किशोर दराडे, आमदार जयंत आसगावकर, आमदार ज. मू. अभ्यंकर, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा, दिंडोरी खासदार भास्करराव भगरे, तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण उपसंचालक संपत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
अधिवेशन हे दोन सत्रात होणार असून या अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येणार. . यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना व शैक्षणिक कामे, १५ मार्च २०२४ संच मान्यता शासन आदेशातील निकषासंदर्भात फेरविचार करून परिपत्रक रद्द करणे, ऑनलाईन कामे कमी करणे, नवीन शैक्षणिक धोरण, सीबीएससी अभ्यासक्रम, शिक्षक भरती, शिपाई भरती बंदी, कला, क्रीडा शिक्षक भरती या व इतर समस्या राज्याच्या वरिष्ठांसमोर मांडण्यात येणार आहेत. यावेळी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. या अधिवेशनाला बहुसंख्येने उपस्थित राहावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी मार्गदर्शक गुरुनाथ पेडणेकर व सचिव विजय मयेकर यांनी सभासदांना आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शंभर शिक्षकांना अधिवेशनाला घेऊन जायचे असा निर्धार उपस्थित सर्वांनी केला.
या सभेमध्ये अजय शिंदे, विजय मयेकर, गुरुनाथ पेडणेकर, भाऊसाहेब चवरे, अशोक गीते, रमेश ठाकूर, राजेश सिंगनाथ, मारुती पुजारी, आप्पाजी मोहिते, सूर्यकांत सांगेलकर, सुरेश कोळी, धनराज सजगुरे, किशोर वालावलकर, सुजित गंगावणे, राजेंद्र सावंत भोसले, सुनील कांबळे, जयसिंगराव वाघमोडे, एस. एन. सावंत, पी. एम. कांबळे, व्ही. आर. चव्हाण, अर्जुन माळी, राहुल समुद्रे, सचिन पालकर, सिद्धेश कानसे, सुरेश तुंबडा, संजीव राणे, विशाखा पालव, विनिता कविटकर, संजीवनी गवस, मृणाली जाधव, शिमल गावडे, संजय शेवाळे, संतोष पवार, प्रशांत चव्हाण, संभाजी कोरे, शिवराम सावंत हे जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सावंतवाडी तालुकाध्यक्ष दिगंबर मोरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक विजय मयेकर यांनी केले. सूत्रसंचालन विशाखा पालव यांनी केले. भाऊसाहेब चवरे व संजय शेवाळे यांनी आभार मानले.













