कुडाळ मान्सून रन या मॅराथॉनला 2024 मधील बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन पुरस्कार

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेन्टरच्या वतीने करण्यात आले होते आयोजन

कुडाळ : राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेन्टरच्या वतीने कुडाळ येथे आयोजित केलेल्या कुडाळ मान्सून रन या मॅराथॉनला 2024 मधील बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन पुरस्कार देवून गौरविण्यात आले. मुंबई रोड रनर्स या ग्रुप कडून दर वर्षी उत्कृष्ठ मॅरेथॉन आयोजक आणि विजेत्या स्पर्धकांना हा पुरस्कार देण्यात येतो. जवळपास प्रमुख 25 मॅराथॉन मधून कुडाळ मान्सून रन ची 2024 सालची सर्वोत्कृष्ट हाफ मॅराथॉन म्हणून निवड करण्यात आली तर टाटा मॅरेथॉन ची सर्वोकृष्ट फुल मॅरेथॉन म्हणून निवड करण्यात आली.


मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात श्री. राम सुब्रमण्यम यांच्या हस्ते सौ. मिलन राणे, श्री. अजित राणे , डॉ. जी. टी. राणे , डॉ. प्रशांत मडव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
श्री अजित राणे यांनी याप्रसंगी आयोजकांचे आभार मानले आणि मुंबई येथील सर्व धावपटुंना कोकणातील पावसाळी निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी या मॅराथॉन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.


गेल्यावर्षी टीम के. एम. आर यांच्यावतीने पहिल्यांदाच कुडाळ मान्सून रन चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. सई राणे, डॉ. जी. टी. राणे, श्री. अजित राणे, डॉ. जयसिंह रावराणे, डॉ प्रशांत मडव , डॉ प्रशांत सामंत, श्री. रूपेश तेली, श्री. शिवप्रसाद राणे, श्री. गजानन कांदळगावकर, श्री. भूषण तेजम, श्री. अमित तेंडोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले होते.


यंदा सुद्धा कुडाळ मान्सून रन चे आयोजन करण्यात येणार असून १३ जुलै 2025 रोजी ही मॅराथॉन स्पर्धा घोषित करण्यात आली आहे. त्यासाठी नावे नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ २ एप्रिल रोजी करण्यात येईल. गेल्यावर्षी जिल्ह्यातील ज्या महिलांनी या स्पर्धेत सहभागी होत पदक प्राप्ती केली त्यांच्या हस्ते हा शुभारंभ होईल . या प्रसंगी डॉ अनघा बोर्डवेकर, डॉ शुभांगी जोशी, सुजाता रासकर, अॅड. सोनल पालव , स्नेहा बोर्ड वेकर, डॉ अमृता वेझरे तसेच रांगणा रागिणी , सिंधू रनर्स मधील महिला धावपटुंना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.


टीम के एम आर तर्फे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे सर्वे सर्वा श्री. उमेश गाळवणकर यांचेही त्यांचा परिसर मेरोथॉनसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानन्यात आले.
यावर्षी जसा पुरस्कार मिळाला तसाच तो पुढील वर्षी पुन्हा मिळवू अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली. यंदा सुद्धा आपण सर्वांनी या मॅराथॉन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!