मतदारसंघातील गंभीर आजारी रुग्णांना आमदार नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने आधार दिला आहे. नितेश राणे मुळेच आपल्याला पुनर्जन्म मिळाला असल्याचे अनेक रुग्ण सांगत आहेत. या रुग्णांमध्ये तालुक्यातील उंबर्डे, कोळपे गावातील मुस्लिम समाजातील रुग्णांचा देखील समावेश आहे. मदतीसाठी आलेल्या रुग्णांना नितेश राणे यांनी कधीच जात विचारली नाही. असे काम करणाऱ्या तसेच मतदारसंघात विकास निधी खेचून आणण्याची धमक असणाऱ्या नेत्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी वैभववाडी येथे केले.
वैभववाडी येथे विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ अबीद नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच घरी जात गाठीभेटी घेतल्या. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, भाजपा पदाधिकारी सज्जन काका रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अतुल सरवटे, महिला तालुकाध्यक्ष श्रेया मुद्रस, तालुका सचिव गणेश पवार, शहर उपाध्यक्ष भगवान काटे, बाळा माळकर, वासुदेव चव्हाण, शुभांगी मुद्रस व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अबीद नाईक म्हणाले, 2018 मध्ये कणकवली नगरपंचायत निवडणुकीत येथे नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली आघाडी केली. आजही आम्ही सर्वजण महायुतीत आहोत. या निवडणुकीत नितेश राणेंचा विजय निश्चित आहे. काही गावात विरोधी उमेदवाराकडे कार्यकर्तेच नाहीत. काही गावात टेबल ही लागणार नाहीत. परंतु आपण गाफील राहू नका, घरोघरी जाऊन महायुतीच्या सरकारने राबविलेल्या योजना, विकास कामे घराघरात पोहोचवा. आमदार नितेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळण्यासाठी सर्वांनी युतीचा धर्म पाळा. महायुतीचे नेते अजितदादा पवार, सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना अशा सक्त सुचना दिल्या आहेत. महायुतीच्या उमेदवाराचे काम पूर्ण ताकतीने केले पाहिजे. वैभववाडी तालुक्यात आम्ही घरोघरी जाऊन काम करून जास्त मताधिक्य देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे अबीद नाईक यांनी सांगितले. यावेळी सुधीर नकाशे, सज्जनकाका रावराणे, वैभव रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले.