शिरोड्यात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या तृतीयपंथींना ग्रामस्थांकडून चोप

वेंगुर्ले : शिरोडा बाजारपेठेसह आजूबाजूच्या परिसरात फिरून अर्वाच्य भाषा वापरून जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या पाच तृतीयपंथींना ग्रामस्थांनी यथेच्छ चोप देऊन गावातून हाकलून लावले. ही घटना रविवारी दुपारी घडली. पाचही दारुच्या नशेत होते. ग्रामस्थांनी पोलिसांच्या सहाय्याने त्यांना गावातून पळवून लावले.

शिरोडा येथील रविवारी आठवडा बाजार होता. याच बाजारात पैसे मागण्याच्या उद्देशाने पाचही तृतीयपंथी फिरत होते. दारूच्या नशेत असल्याने ते समोरच्या लोकांना घाबरवून मोठ्या रकमेची मागणी करत होते. दहा रुपये दिले तर नको पन्नास रुपये द्या, शंभर रुपये दिले तर दोनशे रुपये द्या. अशी मागणी करत होते. पैसे दिले नाही तर तुमचं बरं होणार नाही अशी भीती ही घालत होते. सुरुवातीला ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केला. मात्र त्यांच्याकडून महिला वर्गाकडूनही जबरदस्तीने पैसे मागण्याचा आणि त्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू होताच ग्रामस्थांनी त्यांना एकत्र पकडून जाब विचारत चोप दिला. तसेच याबाबत शिरोडा येथील पोलिसांना माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी शिरोडा केरवाडा येथे तीन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे गावात अशा अनोळखी व्यक्ती फिरत असतील तर त्यांची पोलिसांनी माहिती घ्यावी. संशयास्पद आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे शांत असलेल्या गावात अशांतता पसरवू पाहणाऱ्या अशा व्यक्तीं पुन्हा गावात येणार नाही यासाठी पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

error: Content is protected !!