वैभववाडी : दाट धुक्यात टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजता तिरवडे या ठिकाणी घडली. मयत तरुण रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत होता. दोन वर्षांपूर्वीच तो पोलीस दलात भरती झाला होता.
खारेपटण – कोल्हापूर मार्गावरती भाजीची वाहतूक करणारा टेम्पो व दुचाकीस्वार यांच्यात हा अपघात झाला. सदर टेम्पो कोल्हापूरहून वैभववाडीकडे येत होता. दरम्यान रत्नागिरीहून स्कुटी वरून हा तरुण कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. धुक्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी टेम्पो वरती आदळली. व तो रस्त्यावर कोसळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी वैभववाडी पोलिसांनी धाव घेतली. मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.