जेवण न दिल्याच्या रागातून मारहाण ; संशयित ७ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
मालवण : कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण दिले नाही या रागातून काही तरुणांच्या जमावाने हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण, सोन्याच्या दागिन्यांची चोरी तसेच साहित्याची तोडफोड केल्याची घटना रात्री १२.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी वैभव मयेकर (रा. धुरीवाडा मालवण) याच्यासह अनोळखी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की कुंभारमाट येथील खालसा धाब्यावर काल रात्री वैभव मयेकर याच्या स्वतःचे अन्य साथीदार जेवण करण्यासाठी गेले होते मात्र त्यांना जेवण देण्यास नकार दिल्याने या तरुणांनी हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण केली. हॉटेलच्या साहित्याची तोडफोड करत सोन्याच्या दागिन्यांचीही चोरी केली. याबाबतची तक्रार खालसा ढाब्याचे बलजींदर निर्मल सिंह (मूळ रा. विजयनगर गंगानगर, राजस्थान सध्या रा. कुंभारमाठ गोवेकरवाडी ता. मालवण) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार संशयित आरोपी वैभव मयेकर याच्यासह अनोळखी अन्य सहा जणांविरोधात येथील पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित वैभव मयेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे करत आहेत.













