बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहिल्यामुळे एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडलीय. ही घटना बीडच्या धारूर येथे घडलीय. जखमी तरुणावर सध्या अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सरपंच हत्याप्रकरणी राज्यभरात चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यातील गुंडगिरी अजून कमी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात गुन्ह्याच्या घटना दिवसेंदिवस घडताहेत. सरपंच हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलंय. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे एकामागून एक प्रकरणे समोर येत आहेत. त्यात असेच एक प्रकरण समोर आले आहे. वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहिल्या म्हणून एका तरुणाला मारहाण झालीय.
अशोक शंकर मोहिते आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या पाहत होता. यादरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी आमच्या बातम्या का पाहतोस.. लय माजलेत यांच्याकडे बघावे लागेल.. असे म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली. तू येथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मीक अण्णाच्या बातम्या व व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या दोघांनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













