पुणे: नमस्कार सर, महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत.त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप कॉलवर एक मिटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल, त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील…
तर दुसरा कॉल एका महिलेचा आहे.नमस्कार सर मी रोहन कन्सल्टन्सी नागपूर मधुन बोलत आहे. आपले बोलणे झाल्याप्रमाणे आपण महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप कॉलवर एक मीटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल. असे संभाषण रेकॉर्ड झालेला एक कॉल एका महिलेचा विद्यार्थ्याला आला आहे.
अशाप्रकारे विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे कॉल्स काही विद्यार्थ्यांना आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून, आयोगाने पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण
परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असून, या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही.उमेदवारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच असे दूरध्वनी आल्यास contact-secretary @mpsc.gov.in या ईमेलवर यासंदर्भातील तक्रार दाखल करावी. उमेदवारांनी अशा प्रकरणांमुळे विचलित ना होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. या प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात येत आहे असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिवांनी कळविले आहे.एमपीएससीचा पेपर 40 लाख रुपयांमध्ये विकण्याच्या संदर्भात प्रसार माध्यमावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग मुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.पेपर फोडणाऱ्या या टोळ्यांमुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विशेष पोलीस पथक स्थापन करून प्रकरणाचा तपास करावा व सत्य विद्यार्थ्यांसमोर आणावे, नितीन आंधळे – स्पर्धा परीक्षार्थी













