१७ उमेदवार निवडणूक रिंगणात
कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार आहे. सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्यासाठी सर्वच उमेदवारांमधे आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
दरम्यान आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दिवसा अखेर फक्त चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. विधानसभेच्या तीन जागांसाठी आता निवडणूक रिंगणात १७ उमेदवार आहेत. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
कोणी माघार घेतली?
कणकवली मतदार संघातून आज अपक्ष उमेदवार प्रकाश नारकर आणि विश्वनाथ कदम यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीकडुन नितेश राणे, महाविकास आघाडीतून संदेश पारकर बसपाकडुन चंद्रकांत जाधव आणि अपक्ष गणेश माने, बंदेनवाझ खानी आणि संदेश परकर हे रिंगणात आहेत.
कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातून आज दोघांनी माघार घेतली. यात अपक्ष उमेदवार स्नेहा नाईक व प्रशांत सावंत यांचा समावेश आहे तर आता ५ जण निवडणुक रिंगणात आहेत. यात महायुतीचे निलेश राणे, महाविकास आघाडीकडुन वैभव नाईक, महराष्ट्र स्वराज्य पार्टीचे अनंतराज पाटकर बसपाचे रविंद्र कसालकर अपक्ष म्हणून उज्वला येळावीकर यांचा समावेश आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून आज कोणीही माघार घेतलेली नाही. त्यामुळे महायुतीतून दीपक केसरकर, महाविकास आघाडीतून राजन तेली, अपक्ष म्हणून भाजपाचे बंडखोर उमेदवार विशाल परब, शरद पवार राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार अर्चना घारे अपक्ष म्हणून दत्ताराम गावकर आणि सुनिल पेडणेकर यांचा समावेश आहे.













