मोठी बातमी ! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सर्व विभागांसाठी पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात पुन्हा आघाडीवर येईल, असा विश्वास व्यक्त केला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विभागाने पाऊले उचलावीत, अशी सूचना त्यांनी दिली. यावेळी, शालेय शिक्षण विभागाने 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न अंगीकारून आवश्यक बदल करण्यासंदर्भातही निर्देश दिले.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे, राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सुधारणा करण्यावर पुढील 100 दिवसांत शासनाकडून जोर देण्यात येत असल्याचे दिसून येते. तसेच, केंद्रीय शिक्षण पद्धतीचा गरजेनुसार अवलंबही केला जाईल. चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्नचा विचार आपण करत आहोत, पुढच्या टप्प्यात सीबीएससी पॅटर्नच्या ज्या चांगल्या बाबी आहेत, त्या आपण शाळांमध्ये घेऊ, असे दादा भुसे यांनी म्हटलं. सन 2026-27 मध्ये सीबीएसई पॅटर्नचा वापर होईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी म्हटलं.राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीतापाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य असल्याचे मतही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं. राज्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यापुढं राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत लावणं सक्तीचं असल्याचे भुसे म्हणाले. मराठी भाषा प्रत्येक शाळेत शिकवणं सक्तीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

error: Content is protected !!