अभिनेत्री उर्मिला कानेटकर- कोठारेच्या गाडीचा भीषण अपघात

कारने दोन मजुरांना उडवलं;उर्मिला कानेटकर व चालकही जखमी

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली असून उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.शुटींग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात उर्मिलाही गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने अभिनेत्रीचा जीव वाचला. असं असलं तरीही तिच्या कारचा मात्र चक्काचुर झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झालाय.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली, या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.

error: Content is protected !!