अंजली दमानियांचा मोठा दावा
बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडकडे रवाना झालेल्या अंजली दमानिया यांनी आपण मोर्चात सहभागी होणार नसून ठिय्या आंदोलन करुन संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणार असल्याचं एका वृत्त वहिनीशी बोलताना सांगितलं. इतक्यावरच न थांबता या प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर करण्यात आल्याचा फोन आपल्याला आल्याचा दावाही अंजली दमानियांनी केला आहे.पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील तिन्ही फरार आरोपींचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक दावा केला आहे. “बाकी आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन आम्ही आलो होतो. पण एक धक्कादायक बातमी मला सांगायची आहे. काल रात्री जवळपास साडेअकराच्या आसपास मला फोन आले आणि त्यात असं सांगण्यात आलं की, ते तीन आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाही कारण त्यांचा मर्डर झाला आहे. हे ऐकून इतकं हदरायला झालं की मी ताबडतोब पोलीस निरिक्षकांना फोन करुन याची माहिती दिली. ते मेसेज त्यांना सांगितले. त्याची चौकशी ते करतील. हे किती खरं किती खोटं मला ठाऊक नाही. पण असं झालं असेल तर हे अतिशय भयानक आहे,” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
मर्डरसंदर्भात पोलीस काय म्हणाले?
वाल्मिक कराडलाच वाचवण्यासाठी त्यांचा मर्डर केला असेल? असं विचारलं असताना अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडही आहे की नाही ठाऊक नसल्याचं विधान केलं. “आता वाल्मिक कराड देखील आहे की नाही काय माहिती? कोण काय कोणाला मारतंय काय चाललंय काहीच कळत नाहीये. मी पोलीस निरिक्षकांना ही माहिती दिली तर त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले यावर कन्फॉर्मेशन आलेलं नाही असं ते म्हणाले. मात्र असं काही झालं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं नाही. म्हणून काहीच कळत नाहीये,” असंही दमानियांनी म्हटलं.













