सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी : असरोंडी येथील डॉ. अजित सावंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे २० डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता युरोलॉजी अर्थात मूत्रपिंड, मूत्राशय व तत्सम अवयवांच्या संबंधित आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. डॉ. सावंत हे मुंबईमधील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सायन हॉस्पिटल येथील युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख असून, या शिबिरात त्यांच्यासोबत मुंबई युरोलॉजिकल सोसायटीचे अन्य शैल्यचिकित्सकही सहभागी होणार आहेत.
पहिल्या टप्प्यात म्हणजेच २० डिसेंबरला जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांची तपासणी होणार आहे. त्यात गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रिया, पुढच्या टप्प्यात शासकीय महाविद्यालयातच व गरज भासल्यास सायन हॉस्पिटल येथे शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ. सावंत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी, उपक्रम समन्वयक डॉ. अमेय देसाई यांनी केले आहे