भीषण अपघात; पोल्ट्री मालवाहू वाहनाला दुचाकीची जोरदार धडक

दोडामार्ग तालुक्यातील सोनावल गावच्या तरुणाचा जागीच मृत्यू

चंदगड : दोडामार्ग तालुक्यातील सोनावल येथील तरुण शुभम डेगवेकर यांचा चंदगड तालुक्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वाळकोली फाट्या जवळील एका धोकादायक वळणावर हा दुर्दैवी अपघात घडला. शुभम आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना, समोरून येणाऱ्या एका पोल्ट्रीच्या मालवाहू वाहनाला दुचाकीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, शुभम यांचा घटनास्थळीच प्राण गेला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर चंदगड पोलिसांनी तात्काळ पोहोचून घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सध्या या अपघाताचा पुढील तपास चंदगड पोलिसांकडून सुरू आहे.

शुभम डेगवेकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने सोनावल गावासह संपूर्ण दोडामार्ग तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे डेगवेकर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरातून शुभम यांना अत्यंत भावूक वातावरणात श्रद्धांजली वाहिली जात आहे.

error: Content is protected !!