कणकवली पोलिसांची धडक कारवाई!

पहाटेच्या सापळ्यात 68 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा पकडला

कणकवली : कणकवली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची मोठी वाहतूक उधळून लावत तब्बल 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार,खारेपाटण चेकपोस्टवर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वाहनांची तपासणी सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम (ब.नं 1233),पोलीस कॉन्स्टेबल उद्देश कदम (ब.नं . 1238) तसेच होमगार्ड गोपाळ लोके यांनी संशयित गुजरात पासिंगच्या आयशर टेम्पोची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातील माल संशयास्पद वाटल्याने याबाबतची माहिती खारेपाटण दूरक्षेत्राचे अंमलदार श्री.मिलिंद देसाई यांना देण्यात आली.

देसाई यांनी मालाची खात्री केल्यानंतर तो गोवा बनावटीच्या दारूचा साठा असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर त्यांनी ही माहिती ठाणे अंमलदार तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.तेजस नलावडे यांना कळविली.वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक शेडगे यांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली व संबंधित वाहन कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

तपासणीमध्ये आयशर टेम्पोमधून सुमारे 48 लाख रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूचे 1,000 बॉक्स आढळून आले.तसेच 20 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त करण्यात आला.अशा प्रकारे एकूण 68 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी वाहन चालक अर्जिराम गुलाराम गोदारा (वय 24) व क्लीनर मुकेश खिमाराम पंडित (वय 29),दोघेही राजस्थान येथील रहिवासी, यांना ताब्यात घेण्यात आले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. शेडगे करीत आहेत. ठळक बाब म्हणजे खारेपाटण चेकपोस्टवरील सतर्क पोलीस कर्मचाऱ्यांमुळे गोवा बनावटीच्या दारूची मोठी तस्करी उधळून लावत कणकवली पोलिसांनी 68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

error: Content is protected !!