जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी : शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी समन्वयाने नियोजन करून गावागावांत विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ॲग्रीस्टॅकच्या (Agristack) अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय.डी. असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत ही सुविधा पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. कार्यालयात येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी.काढण्याचे नियोजन करावे. तसेच प्रत्येक कार्यालयाबाहेर फार्मर आयडी कसा काढायचा याबाबतची माहिती असलेली प्रसिद्धीपत्रके लावून नागरिकांना मार्गदर्शन करावे. ग्रामीण भागातील व्हॉट्सॲप समूह, तसेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती घराघरांत पोहोचवावी. अधिकाधिक शेतकरी फार्मर आयडी प्रणालीशी जोडले गेल्यास कृषी क्षेत्रातील योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि पारदर्शक होईल असेही त्या म्हणाल्या.


Subscribe










