राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत वैभववाडीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे या राज्यात प्रथम….

पुणे : येथे राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत तब्बल १०७० स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या पर्यवेक्षिका आहेत. त्यांनी वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्याचे नावलौकिक वाढविले आहे.

गेल्या वर्षी त्यांनी राज्यात चौथा क्रमांक मिळवला होता, तर यंदा सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत भाग घेत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. “गांडूळ खताचा प्रभावी वापर, करी आरोग्य सुखकर “ हा उपक्रम घेऊन त्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.त्यांच्या बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रितपणे १० गावांमध्ये गांडूळ खत प्रकल्प उभारला. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. हा उपक्रम पर्यावरण पूरक असून ग्रामीण भागातील शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणारा आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांच्या पोषणासाठी ज्या परसबागेमधे गांडूळ खताचा वापर करून पालेभाज्या व फळभाज्यांमधील पोषण मूल्य वाढविले जाते. यामुळे अंगणवाडी केंद्रातील मुलांमध्ये लहानपणापासूनच पर्यावरण पूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण होते.
विद्या गुरखे यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या बीटमधील सेविका व मदतनीस यांना दिले आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यासाठी त्यांना उप. मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब,वैभववाडीचे तत्कालीन गट विकास अधिकारी रामचंद्र जंगले, बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!