शिक्षक बदल्या ३१ मे पर्यंत होणार पूर्ण
रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्या आता एकाच वेळापत्रकानुसार म्हणजेच दि. 31 मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. बदल्यांचे वेळापत्रकही शासनाने जारी केले आहे. त्यामुळे वर्षभर चालणारा पोळ आता एकाच वेळपत्रकानुसार थांबणार आहे.शिक्षक बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे केली जाते. न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना बदल्यां ऑनलाईन पोर्टलद्वारे राज्यभरासाठी एकाच वेळापत्रकानुसार करावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यभरात याची आता अंमलबजावणी होणार आहे.
कशी असेल बदली प्रक्रिया
सर्वसाधारण संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षकांची संख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी केली जाईल. अवघड क्षेत्रे निश्चित केली जातील. त्यानंतरच दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया राबविली जाईल.
पोर्टल सुरळीत सुरू ठेवण्याची जबाबदारी पुणे येथील माहिती तंत्रज्ञान कंपनीवर
वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर असणार आहे. पोर्टल सुरळीत सुरू ठेवण्याची जबाबदारी पुणे येथील माहिती तंत्रज्ञान कंपनीवर सोपविण्यात आली आहे. काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास व तसे शासनाने कळविल्यास त्या वर्षासाठी हे वेळापत्रक लागू राहणार नाही.
शिक्षकांच्या बदलीचे वेळापत्रक असे…
दि. 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी बदलीपात्र शिक्षकांच्या याद्यांची प्रसिध्दी, दि. 1 ते 31 मार्च उपलब्ध रिक्त जागांची निश्चिती, दि. 1 ते 20 एप्रिल- बदलीसाठी आवश्यक माहिती जिल्हा परिषदेने कंपनीला देणे, दि. 21 ते 27 एप्रिल – समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित करणे, दि. 28 एप्रिल ते 3 मे – विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मधील रिक्त जागा घोषित करणे, दि. 4 ते 9 मे – विशेष संवर्ग भाग 2 मधील रिक्त जागा घोषित करणे, दि. 10 ते 15 मे – बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, दि. 16 ते 21 मे बदलीपात्र शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, दि. 22 ते 27 मे विस्थापित शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, दि. 28 ते 31 मे – अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे.













