ऑनलाईननंतर आता पुन्हा ‘चिठ्ठ्यांचे’ राज्य!
पोलिसांचा दरारा संपला?
सावंतवाडीत भरबाजारात मटका पुन्हा तेजीत!
सावंतवाडी: सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून मटका व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आतापर्यंत गुपचूपपणे ऑनलाईन पद्धतीने चालणारा हा व्यवसाय आता उघडपणे ‘ऑफलाईन’ स्वरूपात, म्हणजेच चिठ्ठ्यांवर आकडे लिहून सुरू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांनी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
टपऱ्या बनल्या अवैध धंद्यांचे अड्डे
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांवरील टपऱ्यांमध्ये हा मटका व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे. मधल्या काळात पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे हा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता. त्यानंतर काही काळ हा प्रकार ‘मोबाईल’ आणि ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून चोरीछुपा पद्धतीने चालत होता. मात्र, आता पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने कागदाच्या चिठ्ठ्यांवर मटका स्वीकारला जात असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
पोलिसांची भूमिका: कारवाईचा इशारा
या संदर्भात पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. “शहरात कोणताही अवैध व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही. पोलिसांनी यापूर्वीही अशा व्यवसायांवर धाडी टाकून ते मोडीत काढले आहेत. जर कुठेही मटका किंवा तत्सम अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तींवर तात्काळ आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


Subscribe









