कुडाळ बाजारपेठेतील रस्त्याचे नूतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला सुरवात

नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी घेतला कामाचा आढावा

कुडाळ : गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम आज अखेर नगरपंचायतीने हाती घेतले. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी कामाचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

कुडाळ बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. अखेर कुडाळ नगरपंचायतकडून आज या रस्त्याच्या नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यावेळी सुरू असलेल्या कामाची नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी सौ. हळदणकर मॅडम यांच्यासह रस्ते कामाच्या दर्जाची सखोल तपासणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान हॉटमिक्स डांबराचे तापमान, वापरलेली सामग्री तसेच त्याचे प्रमाण (क्वांटिटी) यांची तपासणी करून काम ठरवून दिलेल्या निकषांनुसार व योग्य दर्जाने सुरू असल्याची खात्री नगराध्यक्षांनी करून घेतली. तसेच रस्ते काम करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, अशा स्पष्ट सूचना संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी गटनेते श्री. विलास कुडाळकर, श्री. चेतन पडते व श्री. ओंकार साळवी उपस्थित होते. कुडाळ शहरातील नागरिकांना टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेचा कटिबद्ध प्रयत्न सुरू असल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता आनंद शिरवलकर यांनी यावेळी सांगितले. बहुप्रतिक्षित असलेल्या रस्त्याच्या नूतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला आज सुरुवात झाल्यामुळे व्यापारी, ग्राहक व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!