डंपरभर माती ओतून तक्रारदाराचा रस्ताच अडवला
सावंतवाडी : सांगेली नदीपात्रातील अवैध वाळू आणि दगड-गोटे उत्खननाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून, तक्रारदाराच्या घराकडे जाणारा रस्ता माती ओतून अडवल्याचा धक्कादायक प्रकार सांगेली येथे घडला आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सावंतवाडी पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकी पार्श्वभूमी काय?
सांगेली येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार राजकुमार राऊळ, श्रीकांत खोत आणि अन्य ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणी संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना उत्खननाचे परवाने सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र संबंधित परवाने सादर करू शकले नाहीत. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना सात दिवसांत या प्रकरणाचा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
रात्रीच्या अंधारात ‘दडपशाही’
प्रशासकीय कारवाईचा ससेमिरा मागे लागल्याने संतापलेल्या वाळू माफियांनी तक्रारदार श्रीकांत खोत यांना लक्ष्य केले. मंगळवारी रात्री खोत यांच्या घराकडे आणि जमिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डंपर भरून माती ओतण्यात आली, ज्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला.
पोलिसांची कारवाई
रस्ता अडवल्याचे लक्षात येताच खोत यांनी तातडीने १०० नंबरवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. बुधवारी सकाळी पोलिसांनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. अवैध उत्खननाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांना अशा प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न झाल्याने सांगेली परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.


Subscribe








