आठवडा बाजारासाठी पर्यटन केंद्रातील स्वच्छतागृह उपलब्ध करून द्या…

श्रेयश मुंज; पालिका प्रशासनासह नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे मागणी…

सावंतवाडी : येथील आठवडा बाजारात येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय लक्षात घेता बाजूच्या पर्यटन केंद्रात सुरू असलेले स्वच्छतागृह डागडुजी करून तात्काळ खुले करण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी केली आहे. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून येथील पर्णकुटी विश्रामगृहाच्या परिसरात आठवडा बाजार हलविण्यात आला. परंतु त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नाही त्यामुळे व्यापारी व विशेषतः महिलांना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आठवडा बाजार येथील पर्णकुटी विश्राम गृहाच्या परिसरात नेण्यात आला त्या ठिकाणी बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहराच्या एका बाजूला हा आठवडा बाजार असल्यामुळे कोणालाही त्रास नाही. ही जमेची बाजू आहे. परंतु त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहक व विशेषता व्यापाऱ्यांना स्वच्छतागृह नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांची व विशेषता महिलांची मोठी गैरसोय होत आहे. त्या ठिकाणी स्वच्छतागृह नव्याने उभारण्याची मागणी होत आहे. परंतु सद्यस्थितीत बाजाराला लागून असलेल्या नगरपालिकेच्या पर्यटन सुविधा केंद्रात असलेले स्वच्छतागृह बंद आहे. त्या स्वच्छतागृहाचे नूतनीकरण केल्यास त्याचा फायदा निश्चितच येथील लोकांना व व्यापारी व ग्राहकांना होऊ शकतो. त्यामुळे याबाबत नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घेऊन हे स्वच्छतागृह लोकांसाठी उपलब्ध करून द्यावे जेणेकरून बंद असलेल्या पर्यटन केंद्रातील स्वच्छतागृह सुरू होईल आणि नव्याने स्वच्छतागृह बांधण्याचा खर्च होणार नाही.

error: Content is protected !!