खारेपाटण येथे घराला आग

लाखोंचे नुकसान

कणकवली : खारेपाटण (ता. कणकवली) येथील बंदरवाडीत सोमवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत विनायक धोंडू पिसे यांच्या दुमजली घराचे सुमारे ३ लाख ५६ हजार ७५० रुपयांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.

सोमवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता घराच्या वरच्या मजल्यावर आग लागली. त्या वेळी वरच्या मजल्यावर कोणीही नसल्याने आग कोणाच्या निदर्शनास आली नाही. काही वेळाने छपरातून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने बाजूला काम करणाऱ्या मजूर महिलांनी हा प्रकार पाहून तातडीने सूचना दिली.

घटनेची माहिती मिळताच बंदरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते गौरव ढेकणे यांनी धाव घेऊन स्थानिकांना पाचारण केले. अग्निशामक बंबाची सुविधा नसतानाही स्थानिकांनी औषध फवारणीच्या पंपांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

आगीत घराचे संपूर्ण छप्पर, फर्निचर, टीव्ही, कपाटे, कपडे, पलंग आणि इतर घरगुती साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात ३.५६ लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले असून आग लागण्याचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

error: Content is protected !!