मालवण : जागतिक दिव्यांग दिनाचे (३ डिसेंबर) औचित्य साधून सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै सेवांगण हॉल, मालवण येथे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात सौ. रेवा सुजित कदम यांना ‘जिल्हास्तरीय सिंधुरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
अंधांसाठी मोबिलिटी प्रशिक्षक, ब्रेल लिपी प्रशिक्षक आणि ‘स्पर्शज्ञान’ पाक्षिकाच्या अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ. रेवा कदम यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
पुरस्काराबद्दल बोलताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सौ. रेवा कदम या अंधांसाठी मोबिलिटी प्रशिक्षक, ब्रेल लिपी प्रशिक्षक आणि ‘स्पर्शज्ञान’ पाक्षिकाच्या अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, सौ. कदम यांचा डेअरी व्यवसाय हा त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. हा व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळून त्यांनी अंधांसाठी ब्रेल लिपी प्रशिक्षण, मोबिलिटी प्रशिक्षण तसेच आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामाजिक प्रगती साधण्याचे जे प्रयत्न केले, या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी श्री. श्याम चव्हाण, मालवणच्या प्रांताधिकारी सौ. ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार सौ. सुप्रिया परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Subscribe






