सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा

कुडाळ तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

कुडाळ : बहुजन समाजाबद्दल जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलिसांकडे सुपूर्त केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोशल मीडियावर कुडाळ बस स्थानकातील व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये संबंधित व्यक्ती जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बहुजन समाजासह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची माफी मागताना पहायला मिळत आहे. या व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, संबंधित व्यक्ती कुडाळ एस. टी. आगारात कार्यरत असून वारंवार बहुजन समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करते. तसेच समाजाला नेहमीच गलिच्छ वागणूक देण्याचा प्रयत्न करते. संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी सत्यवान तेंडोलकर, विजय जाधव, मंगेश गावकर, चंद्रकांत वालावलकर, अर्जुन जाधव आदी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी यांनी दोन दिवसात संबंधित व्हिडिओची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

error: Content is protected !!