स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
सावंतवाडी : इन्सुली कोठावळेबांध येथे अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई आज (बुधवारी) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून या कारवाईमध्ये अवैध गोवा बनावटीची दारू व क्रेटा कारसह तब्बल १३ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळाली. त्यानुसार मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली कोठावळेबांध येथे सापळा रचत कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत ओमकार अनिल गावकर (रा. खासकीलवाडा, सावंतवाडी), सद्गुरू पाटील (रा. माठेवाडा, सावंतवाडी), सतीश करंगुटकर (रा. खासकीलवाडा, सावंतवाडी), जतिन गावडे (रा. सावंतवाडी), अक्षय खटावकर (रा. राजापूर, जि. रत्नागिरी) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ अ, इ, ८१, ८३ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम त्यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा, सदानंद राणे, डाँमनिक डिसोजा, जॅक्सन घोन्सालविस, आशिष जामदार, पोलीस अंमलदार महेश्वर समजीसकर यांनी केली.



Subscribe









