वेंगुर्ला : वाळूची अवैध वाहतूक आणि बेदरकारपणे डंपर चालवून पळून गेल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी मठ ठाकुरवाडी येथील डंपर चालक आणि मालक भरत ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी सकाळी ७ च्या सुमारास, गौण खनिज भरारी पथकाचे ग्राम महसूल अधिकारी रजनीकांत नायकवडे तपासणी करत असताना, त्यांना वेंगुर्ले कॅम्पच्या दिशेने येणारा एक डंपर दिसला. त्यांनी डंपर चालकाला थांबवून वाळू वाहतुकीच्या परवान्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी, चालकाने कोणताही परवाना दाखवला नाही.
यानंतर, चालकाने आपले नाव न सांगता, डंपर भरधाव वेगाने पुढे नेऊन त्यातील वाळू रस्त्याच्या बाजूला टाकून तेथून पळ काढला. या घटनेनंतर, नायकवडे यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी डंपर चालक आणि मालक भरत ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भगवान चव्हाण करत आहेत.