सावंतवाडी : तालुक्यातील साटेली देऊळवाडी येथील बस स्टॉप च्या बाजूला वेंगुर्ले वरून सकाळी ५:५० ची सुटणारी पणजी (वास्को) जाणारी एसटी बस आणि चिरे वाहतूक करणारा आयचर साटेली च्या दिशेने येत असताना साटेली देऊळवाडी येथील वळणावर समोरासमोर धडकुन अपघात झाला. यावेळी बस मध्ये जवळ जवळ ४१ प्रवासी होते. दोन्ही वाहने एकमेकांना धडक्यानंतर बसमधील काही प्रवाशांना दुखापती झाल्या. स्थानिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यातील काही प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
दोन्ही गाड्यांचे दर्शनी भागांचे नुकसान झाले असून, सातार्डा पोलीस ठाण्याचे सहा. उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर, सुभाष नाईक, कॉन्स्टेबल राहुल बरगे घटनास्थळी दाखल होत अधिक तपास करत आहेत.
मात्र सध्या सगळीकडे रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने वाहन चालवताना वाहनचालकांची तारांबळ उडत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. एखाद वाहन अचानक समोरून आल्यास या वाढलेल्या झाडीमुळे दिसत नाही. याची बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेण्याची गरज आहे.