एकूण २० फेऱ्या २५८ कर्मचारी नियुक्त
कुडाळ प्रतिनिधी : काल दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक मतदान पार पाडले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मतमोजणी आणि येणाऱ्या निकालाकडे लागून आहे.दरम्यान अतिशय चुरशीची लढत झालेल्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी कुडाळ तहसील कार्यालय परिसरात सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. १४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण वीस फेऱ्या होणार आहेत. यासाठी २५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २३ रोजी सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होऊन दुपारी बारापर्यंत कुडाळ-मालवण मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे. सुरक्षेच्यादृष्टीने तीन टप्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली.
प्रशासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया झाली. यानंतर आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. राजकीयस्तरावर विविध लोकप्रतिनिधी मतांची आकडेवारी करण्यात व्यस्त आहेत, या अनुषंगाने तहसील कार्यालय येथे मतमोजणीची तयारी सुरू आहे. अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.













