सावंतवाडी येथील शिक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

जंगलमय भागात आढळला मृतदेह

सावंतवाडी : येथील कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक सुमित बाबी जंगम (वय अंदाजे ५४-५६) यांनी आज ओवळीये, ता. मालवण येथील आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलमय भागात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सूर्यकांत भुरे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित जंगम आज सकाळी नेहमीच्या वेळेनुसार शाळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे शाळेकडून त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, ते ओवळीये येथील जंगलमय भागात मृतावस्थेत आढळल्याचे समोर आले. ते शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते, मात्र वाटेतच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

सुमित जंगम यांची कळसुलकर हायस्कूलमध्ये १० डिसेंबर रोजी अतिरिक्त शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती आणि ते आणखी सहा वर्षांनी सेवानिवृत्त होणार होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच, कळसुलकर हायस्कूलमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहून शाळा सोडण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच कळसुलकर हायस्कूलचे सर्व शिक्षक ओवळीये येथील जंगम यांच्या घरी रवाना झाले आहेत. त्यांच्या मृतदेहाचे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, याबाबत आचरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जंगम यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

error: Content is protected !!