पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता
कुडाळ : आज, गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील सातेरी मंदिरालगतच्या हातेरी नदीच्या पात्रात एका वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बाबली भोंगू वरक (मूळ रा. नेरुर देऊळवाडा) असे या मृत वृद्धाचे नाव आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबली वरक हे पणदूर येथे नदी ओलांडत असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज आला नसावा, त्यामुळे ते पाण्यात वाहून गेले असावेत अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचा मृतदेह सुमारे ३०० मीटर अंतरावर असलेल्या एका मोडकळीस आलेल्या पुलाखाली आढळून आला.
या घटनेची माहिती पणदूर गावचे पोलीस पाटील देऊ सावंत यांनी तातडीने कुडाळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासणीसाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
यावेळी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश शिंगाडे, आणि कॉन्स्टेबल सागर देवार्डेकर हे देखील उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.