नागरिकांमध्ये समाधान!
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांच्या बाजूला असलेल्या साईड पट्ट्यांच्या कामाची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्या सूचनेनुसार हे काम तात्काळ हाती घेण्यात आले असून, यामुळे शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
गेली तीन वर्षांपासून शहरातील अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतच्या मुख्य रस्त्याची साईड पट्टी अत्यंत खराब झाली होती. या खराब झालेल्या साईड पट्टीमुळे वाहनधारकांना अपघातांचा धोका निर्माण झाला होता, तसेच वाहतुकीलाही अडथळा येत होता. या साईड पट्टीच्या दुरुस्तीसाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते.
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर आणि नगरसेवकांनी या समस्येची गंभीर दखल घेतली. त्यांनी पुढाकार घेऊन या मुख्य रस्त्यावरील साईड पट्टीच्या कामासाठी ठराव मंजूर केला आणि तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने हे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कामामुळे आता वाहनधारकांना सुरक्षित प्रवास करता येणार असून, वाहतुकीची कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे.
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्या या तातडीच्या आणि प्रभावी कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.