ग्रामस्थांचा नगरपंचायतीला १५ दिवसांचा अल्टिमेटम.
कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळ शहर नगरपंचायतीच्या वतीने सांगिर्डेवाडी येथे गेली अकरा वर्षे खाजगी जागेत अनधिकृतपणे सुरू असलेल्या कचरा डेपोचा प्रश्न अखेर पेटला आहे. या डेपोला जमीन मालकांची कोणतीही संमती नसून या कचऱ्यामुळे रॉयलपाम, उद्यमनगर, सांगिर्डेवाडी, पिंगुळी शिक्षक कॉलनी, शेटकरवाडी व गुढीपूर परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न आणि मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी आणि जमीन मालकांनी वेळोवेळी नगरपंचायतीकडे लेखी पत्रव्यवहार केला होता. नगरपंचायतीने काही काळ हा डेपो बंद करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात तो बंद करण्यात आला नाही.
श्री देव वरंडेश्वर मंदिरात बैठक, रस्ता बंद
या पार्श्वभूमीवर सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्री देव वरंडेश्वर मंदिर, कुडाळ येथे कचरा बाधित ग्रामस्थ आणि जमीन मालक यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे जमीन मालकांच्या संमतीने अनधिकृत कचरा डेपोकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
पोलीसांना आणि नगरपंचायतीला निवेदन
कचरा डेपो बाधित ग्रामस्थांनी दोन स्वतंत्र निवेदने दिली आहेत.
पोलीस निरीक्षक, कुडाळ यांना दि. ०६/१०/२०२६ रोजी दिलेल्या निवेदनात अनधिकृत कचरा डेपो पुन्हा सुरू करण्यासाठी नगरपंचायतीला पोलीस संरक्षण देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर पोलीस ठाणे अंमलदार यांचा शिक्का प्राप्त झाला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपंचायत कुडाळ यांना दि. ०८/१०/२०२६ रोजी दिलेल्या निवेदनात* – सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपो तात्काळ बंद करावा व तेथे टाकण्यात आलेला कचरा पुढील १५ दिवसात स्थलांतरित करावा. अन्यथा हा कचरा नगरपंचायत कार्यालयासमोर आणून टाकण्यात येईल, असा सर्वानुमते इशारा देण्यात आला आहे.
तसेच डेपो पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास व कचरा न हटवल्यास आपल्या विरोधात – कलम २७० (BNS) / २६९ आणि २७० (IPC) – संसर्गजन्य रोग पसरवण्यास कारणीभूत ठरणे- कलम २७१ (BNS) / २७८ (IPC) – वातावरण प्रदूषित करणे- कलम २७६ (BNS) / २९० (IPC) – सार्वजनिक उपद्रव (PUBLIC NUISANCE) निर्माण करणे
या कलमांअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नाईलाजाने करावी लागेल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.


Subscribe










