सांगली जत येथे नेऊन मारहाण
कुडाळ : उसतोडीच्या कामासाठी घेतलेली हातउसनी रक्कम परत न केल्याच्या कारणातून कुडाळ शहरातील प्रकाश रमेश पवार (३८) यांचे अपहरण करून त्यांना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिकोंडी येथे नेल्याची घटना समोर आली आहे. तेथे त्यांना मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. कुडाळ पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई करत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली असून, जयवंत कोंडीबा करे (४०, रा. तिकोंडी, जत, जि. सांगली) याला अटक केली आहे.
प्रकाश पवार यांच्या पत्नी सुनिता पवार यांनी याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, प्रकाश यांनी उसतोडीच्या कामासाठी जयवंत करे याच्याकडून काही रक्कम हातउसनी घेतली होती. ही रक्कम परत न केल्याच्या कारणातून २९ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता कुडाळ बसस्थानक परिसरातून प्रकाश यांना घेऊन जाण्यात आले. त्यानंतर त्यांना जत-तिकोंडी येथे नेऊन मारहाण केल्याचा आरोप आहे. पती बेपत्ता झाल्यानंतर सुनिता पवार यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि २ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुडाळ पोलिसांनी तपासाला तत्काळ सुरुवात केली. मोबाईल आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेत पोलिसांचे पथक जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोहोचले. तेथे शोध घेतल्यानंतर पोलिसांना जयवंत करे याचा ठावठिकाणा मिळाला. त्याचबरोबर अपहरण झालेल्या प्रकाश पवार यांचाही शोध घेण्यात आला. ३ ऑक्टोबर रोजी दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसांनी कुडाळ येथे आणले.
कुडाळ येथे आणल्यानंतर जयवंत करे याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शेष मोरे, प्रमोद काळसेकर, रूपेश गुरव आणि महिला पोलिस सुप्रिया भागवत यांनी तपासात सहभाग घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम, विभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत आणि कुडाळ पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


Subscribe










