ग्रामस्थ, महिला व युवा पिढी एकवटली.
केतन शिरोडकर /पिंगुळी
पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी पिंगुळी येथील गणेश मंदिर शेटकरवाडी येथे काल सायंकाळी ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत वनराई बंधारा उभारून पाण्याचा साठा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आज ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदानातून वनराई बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली.
या उपक्रमाला शेटकरवाडीतील बहुसंख्य शेतकरी, ग्रामस्थ तसेच युवा पिढीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ७५ ग्रामस्थ आणि ३० महिलांनी या कामात सहभाग घेतला. सर्वांनी एकजुटीने श्रमदान केल्याने आजचे काम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून, आगामी काळात विहिरींच्या पाण्याची पातळी टिकविण्यासाठी या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे. पाण्याची गरज केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण वाडीतील प्रत्येक कुटुंबाला आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी हा सामूहिक प्रयत्न महत्त्वाचा ठरणार आहे.
आजच्या श्रमदानासाठी उपस्थित राहिलेल्या शेटकरवाडीतील सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग आणि युवा पिढीचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


Subscribe










