गॅस पाईपलाईनच्या कामात पिण्याची जलवाहिनी फुटली

पहाटेपासून लाखो लिटर पाणी वाया, नागरिकांमध्ये संताप.

केतन शिरोडकर /पिंगुळी

एकीकडे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश देत पाण्याचे संवर्धन करण्यासाठी सामाजिक व राजकीय मंडळींकडून वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरू असताना, दुसरीकडे पिंगुळी येथे पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पाणी बचतीच्या प्रयत्नांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील स्वामी नंदन सोसायटीसमोर, वेंगुर्ला रोडवर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना सोमवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटली. जमिनीखाली असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पाईपलाईन फुटल्यानंतर मोठ्या दाबाने पाणी बाहेर पडत राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि लाखो लिटर पिण्याचे पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून गेले. पाण्याची अशी नासाडी होत असताना संबंधित काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक ती पाहणी आणि खबरदारी घेण्यात आली होती का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एका बाजूला बंधारे, दुसऱ्या बाजूला पाण्याची नासाडी!

सिंधुदुर्गात सध्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानाला गती देण्यात आली आहे. गावागावांत सामाजिक कार्यकर्ते, राजकीय मंडळी आणि ग्रामस्थ एकत्र येऊन वनराई बंधारे उभारत आहेत. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे आवाहन केले जात आहे.

मात्र, पिंगुळीत पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाणी वाचविण्यासाठी श्रम घेणाऱ्या नागरिकांच्या प्रयत्नांना अशा प्रकारच्या घटनांमुळे धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पुढील कामांपूर्वी प्रशासनाने दक्षता घ्यावी

गॅस पाईपलाईनचे काम पुढे इतर भागांतही सुरू राहणार असल्याने, अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने संबंधित गॅस कंपनी व ठेकेदारांना आवश्यक सूचना देण्याची मागणी होत आहे.

गॅस पाईपलाईन टाकण्यापूर्वी जमिनीखाली असलेल्या पाणीपुरवठा, वीज तसेच इतर महत्त्वाच्या वाहिन्यांची माहिती घेऊन त्यानंतरच खोदकाम करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

पिंगुळीतील या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन पाणी वाया जाण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबींची चौकशी करावी आणि भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश देण्याबरोबरच उपलब्ध पाण्याचा अपव्यय रोखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशासनाने आता तरी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे असे स्वर नागरिकांमधून उमटू लागले आहेत.

error: Content is protected !!