कुडाळमध्ये बैलाची निर्दयी वाहतूक

दारूच्या नशेत बोलेरो चालवणाऱ्यासह दोघांवर गुन्हा

कुडाळ : बोलेरो पिकअपमधून बैलाची अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याचा प्रकार कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील सुंदरवाडी-वाडीवरवडे परिसरात उघडकीस आला. वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वाहन चालवत असल्याचेही निदर्शनास आल्याने कुडाळ पोलिसांनी तालीम हमीद शेख (३१) आणि अख्तर इब्राहिम खान (५०, दोघेही रा. पिंगुळी-गौधयाळी, ता. कुडाळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. तालीम शेख हा बोलेरो पिकअप चालवत होता. वाहनातून अख्तर खान याच्यासह एका बैलाची वाहतूक केली जात होती. बैलाला वाहनामध्ये अशा प्रकारे बांधण्यात आले होते की, त्याला त्रास व वेदना होण्याची शक्यता होती. तसेच वाहतुकीदरम्यान बैलासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वाडीवरवडे येथील पोलिस पाटील प्रशांत नामदेव धुरी यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २.२५ वाजता पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

मद्यप्राशन करून वाहन चालविणे, भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे तसेच जनावराची त्रासदायक व निर्दयी पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. कुडाळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाडावे करीत आहेत.

error: Content is protected !!