वैभववाडी : ट्रॅक्टरचा पुढील टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघातात करुळ-भोयडेवाडी येथील रुपेश हनुमंत पाटील (४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास एडगाव-आंबेडी परिसरात राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश पाटील हे ट्रॅक्टर (एमएच ०७ एएस ७८१२) घेऊन वैभववाडीहून करुळच्या दिशेने निघाले होते. एडगाव-आंबेडी परिसरातून जात असताना ट्रॅक्टरचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गटारात जाऊन आदळला.
अपघातात रुपेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने खासगी वाहनातून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर करुळ येथील स्मशानभूमीत रुपेश पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुपेश पाटील यांच्या आकस्मिक निधनाने करुळ-भोयडेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजय, पुतणे आणि बहिणी असा परिवार आहे.


Subscribe










