किनळोस येथे शेतकऱ्यांनी बांधला वनराई बंधारा

कुडाळ : यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात फारच काम पाऊस झाला. त्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये फार कमी पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. योग्य वेळी पाण्याचे संवर्धन न केल्यास भविष्यात आपल्याला फार गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात एकूण १० हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत.

परंतु, कुडाळ तालुक्यातील किनळोस गावातील शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रशासनाची वाट न पाहता गावात स्वतःच्या श्रमदानातून त्यांनी बंधारा बांधला. स्थानिक शेतकरी संजय सावंत यांच्या पुढाकारातून हा बंधारा बांधण्यात आला. विशेष म्हणजे गावातील महिला देखील या कामात अग्रेसर होत्या. किनळोस गावातील शेतकऱ्यांनी राबवलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादाई असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी संतोष सावंत, संजय सावंत, कैलास साटम, श्रद्धा सावंत, सोनाली सावंत आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!