चार चाकी वाहन नाही तरीही लाडक्या बहिणींना पैसे मिळणे बंद

ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यंदाच्या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरला. सत्ता आल्या नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले. मात्र त्यानंतर सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याच्या चर्चांना उधाण आले. अशातच लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार ज्या लाडक्या बहिणींकडे चार चाकी वाहन आहे अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नसून यापुढे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची घोषणा सरकारने केली. दरम्यान आता मात्र काही पात्र लाडक्या बहिणींना देखील पैसे मिळणे बंद झाले आहेत.

RTO कडून आलेल्या चार चाकी वाहन यादीमध्ये संभ्रम

दरम्यान अपात्र लाडक्या बहिणींना,ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत अशा बहिणींना सरकाने नाव मागे घेण्यास आवाहन केले. याच वेळी RTO कडून अशा अपात्र लाडक्या बहिणींच्या नावाची यादीच ICDS विभागाकडे आली.मात्र अंगणवाडी सेविकांनी यादी प्रमाणे सर्वे केला असता अनेक लाडक्या बहिणीं जवळ चार चाकी वाहन नसून देखील त्यांचे नाव या यादीत असलेले आढळले.तसेच काही ठिकाणी चार चाकी वाहन 2,3 वर्ष आधीच विकले असल्याचे देखील समजले.

उत्पन्न कमी,चार चाकी वाहन देखील नाही मात्र तरी देखील पैसे येणे बंद

लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करून अनेक अपात्र लाडक्या बहिणींनी स्वतःहून नावे मागे घेतली. तर काही अपात्र बहिणींचे पैसे येणे बंद झाले.मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अचानक पैसे येणे बंद झाले आहे. याबाबत अनेक लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका तसेच तालुक्यातील ICDS विभागात जाऊन याबाबत तक्रार करत आहेत. ई के वायसी करून देखील खात्यामध्ये पैसे येणे बंद झाले आहेत,काही लाडक्या बहिणींचे उत्पन्न देखील कमी असून खऱ्या अर्थाने गरजू स्त्रीयांना या योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

ICDS विभाग आणि अंगणवाडी सेविकानं नाहक त्रास

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यापासून त्याची पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळावा यासाठी अंगणवाडी सेविका तसेच ICDS विभागाने अथक प्रयत्न केले असून योजना यशस्वी होण्यासाठी यांचा मोठा वाटा आहे असे म्हटल्यास हरकत नाही. आता मात्र अपात्र लाडक्या बहिणी तसेच पात्र असून पैसे मिळत नाहीत अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या लाडक्या बहिणींना काय उत्तर द्यावे या संभ्रमात अंगणवाडी सेविका तसेच ICDS विभाग आहे.कारण अर्ज अपात्र का झाला किंवा पात्र असून पैसे खात्यावर जमा का झाले नाहीत? याबाबत लाडक्या बहिणींना समाधानकारक उत्तर देणारी अशी कुठलीच यंत्रणा ICDS विभाग तसेच अंगणवाडी सेविकांजवळ नाही. पात्र असून लाभ मिळणे बंद का झाले? पैसे का जमा होत नाही आहेत? ते जरा बघून सांगाल का? या लाडक्या बहिणींच्या प्रश्नांवर काय उत्तर द्यावे हा खरा प्रश्न अंगणवाडी सेविका आणि ICDS विभागासमोर निर्माण झाला आहे. कारण पासबुक मध्ये किंवा आधार कार्ड नंबर मध्ये काही समस्या झाली आहे का? हे पडताळून पाहणारी कुठली लिंक किंवा अँप ICDS विभाग तसेच अंगणवाडी सेविकांकडे नाही.दरम्यान यामुळे पात्र असून पैसे जमा का होत नाही आहेत हा प्रश्न मात्र निरुत्तरीतच राहिला आहे.

error: Content is protected !!